सिंधुदुर्ग
आराध्य गोडवे
सुवर्णझळाळी
राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत
कास्य पदक
कणकवली :
राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करत ‘तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग’च्या आराध्य गोडवे या प्रतिभावान खेळाडूने चमकदार कामगिरी केली आहे. या अत्यंत अतिटीच्या स्पर्धेत आराध्यने कास्य पदक पटकावत सिंधुदुर्गच्या क्रीडा वर्तुळाचा मान उंचावला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, अकोला क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
विजयाची हॅटट्रिक आणि राज्यस्तरावर धडक
यापूर्वी आराध्य याने तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आपल्यातील कौशल्याची चुणूक दाखवून दिली होती. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेतही आपली लय कायम ठेवताना त्याने कास्य पदक आपल्या नावावर केले.
मार्गदर्शन आणि शिक्षण
आराध्य गोडवे हा कणकवलीतील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून नगरवाचनालय हॉल येथे सुरू असलेल्या ‘मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अँड फिटनेस अकॅडमी’ मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांच्या मार्गदर्शनखाली कसून सराव व प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या या यशामध्ये प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव
आराध्यच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हाभरातून त्याचे अभिनंदन होत आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष तथा कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, सचिव भालचंद्र कुळकर्णी, कोषाध्यक्ष सुधीर राणे, विनायक सापळे आणि अमित जोशी यांच्यासह विविध मान्यवरांनी आराध्यचे पुष्पगुच्छ देऊन व कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.








