जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ
सभा

कर्मचारी व शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा; फोंडा स्कूलमधील अजितकुमार देठे यांच्या वेतनाचा मुद्दाही मांडला
सिंधुदुर्गनगरी :
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या दालनात सहविचार सभा आयोजित करण्यात आली. या सभेत विविध विभागांतील कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून संबंधित विभागप्रमुखांचे लक्ष वेधण्यात आले.
सभेला जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे खातेप्रमुख, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव सुरेश तांबे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष तथा समाजभूषण संदीप कदम, महिला व दिव्यांग विभागाच्या महाराष्ट्र राज्यप्रमुख जया पराडकर, सिंधुदुर्ग जिल्हा महासचिव किशोर कदम, माध्यमिक शिक्षण शिक्षक संघटनेचे महासचिव अभिजीत जाधव, उपाध्यक्ष किशोर यादव, जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रोहीत पावरा, ज्ञानेश्वर सोनुने, आरोग्य विभागाचे संघटन गुरखे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.
सभेमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध सेवा विषयक समस्या, प्रलंबित प्रकरणे, पदोन्नती, वेतनविषयक प्रश्न, अनुकंपा नियुक्ती, आरक्षण व पदोन्नतीतील आरक्षणाची अंमलबजावणी, सर्व शाळांना विनाट शालेय पोषण आहार अंतर्गत सिलेंडर उपलब्ध करण्यात यावा, शालेय पोषण आहार अंतर्गत मिळणारे धान्य व मसाले यांचे संबंधित विभागाकडून तपासणी करून ते शाळेंना पुरविण्यात यावे, जूनमध्ये झालेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या समायोजनामध्ये सेवा जेष्ठ पदवीधर शिक्षकांवर अन्याय झाला आहे त्याची सखोल चौकशी व्हावी.अतिरिक्त बदल्या तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि प्रलंबित प्रश्नांची प्रशासकीय स्तरावर सोडवणूक व्हावी, अशी मागणी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील प्रश्नही यावेळी मांडण्यात आले. फोंडा हायस्कूल मधील शिक्षक अजितकुमार विष्णू देठे यांचे वेतन बंद करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून त्याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले. शिक्षण विभागाने यापूर्वी संस्थेला संबंधित प्रकरणाबाबत सूचना दिल्या असून, संस्थेने विभागाच्या निर्णयाला सक्षम प्राधिकरणासमोर आव्हान दिले नसल्याचे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यामुळे देठे यांना तातडीने सेवेत रुजू करून घेऊन त्यांचे वेतन सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
सभेत मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांनी लक्ष देऊन प्रलंबित प्रकरणांचा नियमानुसार निपटारा करावा, अशी भूमिका महासंघाने मांडली. शेवटी महासंघाचे सचिव किशोर कदम यांनी आभार व्यक्त केले








