सम्यक साहित्य संसद
जीवनगौरव,
राज्यस्तरीय
काव्यपुरस्कार
कणकवली (प्रतिनिधी):
सम्यक साहित्य संसदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या अत्यंत मानाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा ‘आ.सो. तथा आबा शेवरे जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार व राजकीय विश्लेषक विनायक मिठबांवकर यांना, तर ‘उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्यपुरस्कार’ कवयित्री स्नेहा कदम यांना त्यांच्या ‘शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून’ या बहुचर्चित काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात येणार आहे.
१६ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात हा शानदार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत शिवा इंगोले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्याच हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
अध्यक्ष: इंजि. अनिल जाधव (अध्यक्ष, सम्यक साहित्य संसद तथा प्रसंवादचे संपादक)
उद्घाटक: प्राचार्य मा. युवराज महालिंगे
प्रमुख पाहुणे: साहित्यिक व प्रकाशक सुनील हेतकर, माजी उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, सिंधुदुर्ग अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, आंबेडकरी चळवळीतील प्रभावी वक्ते व लेखक प्रा. डॉ. सोमनाथ कदम, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत कदम, अपरांन्तचे प्रकाश जाधव आणि दर्पण प्रबोधिनीचे श्रीधर तांबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
विनायक मिठबांवकर (आ.सो. तथा आबा शेवरे जीवनगौरव पुरस्कार):
कोकणातील आंबेडकरी कवितेचे जनक आणि सम्यक साहित्य संसदेचे संस्थापक आ.सो. तथा आबा शेवरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार विनायक मिठबांवकर यांना जाहीर झाला आहे. मिठबांवकर हे केवळ साहित्यिक नसून सम्यक विचारांची प्रदीप्त मशाल पेटवणारे संघर्षशील योद्धे आहेत. त्यांनी आपल्या प्रगल्भ लेखणीने बहुजन समाजाच्या व्यथा मांडल्या. १९७२ साली आलेली त्यांची ‘हे जगणे का?’ आणि १९७३ ची ‘संधीप्रकाश’ या गिरणी कामगारांच्या जगण्यावर आधारित कादंबऱ्यांनी वास्तववादी साहित्याला नवी दिशा दिली. त्यांनी सुरु केलेल्या ‘उधाणलाटा’ साप्ताहिकाने कोकणातील पत्रकारितेला नवे अधिष्ठान दिले. याशिवाय दैनिक मराठा, नवाकाळ, पुढारी, तरुण भारत यांसारख्या अनेक वृत्तपत्रांमधून त्यांनी निर्भीड लेखन केले आहे.
. स्नेहा कदम (उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्यपुरस्कार):
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, विज्ञाननिष्ठा आणि मानव मुक्तीच्या विचारांना आपल्या काव्यातून अधोरेखित करणाऱ्या स्नेहा कदम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उपेक्षित राहिलेल्या अस्मितेच्या प्रश्नांना त्यांनी आपल्या विचारधारेचे केंद्रबिंदू बनवले. साहित्य अकादमी (नवी दिल्ली) येथे निमंत्रित कवयित्री म्हणून त्यांचा गौरव झाला असून, त्यांना यापूर्वी पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार, भीमराव कोते विशेष काव्य पुरस्कार, आणि रत्न सिंधू युवा साहित्य कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे भव्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या सत्राचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी मनोहर सरंबळकर भूषविणार असून, या संमेलनात अनेक मान्यवर कवी-कवयित्री आपल्या रचना सादर करणार आहेत.
कोकणातील परिवर्तनवादी साहित्यविश्वातील या महत्त्वाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व साहित्यिक, विचारवंत, कवी, कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सम्यक साहित्य संसदेचे कार्यवाह राजेश कदम, सहकार्यवाह मधुकर मातोंडकर, कोषाध्यक्ष संध्या तांबे आणि हिशोब तपासणीस दीपक तळवडेकर यांनी केले आहे.








