कुडाळ प्रतिनिधी :
झाराप ग्रामपंचायतीत सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षात आता आणखी एका धक्कादायक प्रकाराची भर पडली आहे. कृषी सहाय्यक जागृती शेट्ये यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्या सह्यांशिवाय, तसेच कोणताही जावक क्रमांक नसलेले ग्रामसभेचे अजेंडा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्याने ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडाली आहे.
सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावरील अविश्वास ठरावाला मा. जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर त्या पुन्हा सरपंच पदावर रुजू झाल्या आहेत. मात्र, त्यानंतरही ग्रामपंचायतीतील काही अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप आता समोर येऊ लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
ग्रामसभेसंदर्भातील जे अजेंडा पत्रक शेतकऱ्यांना देण्यात आले, त्यावर ना सरपंचांची सही होती, ना ग्रामसेवकाची सही, ना कोणताही अधिकृत जावक क्रमांक होता. विशेष म्हणजे त्या पत्रकात फक्त ग्रामसभेचा विषय आणि तारीख नमूद करण्यात आली होती. अधिकृत मंजुरी आणि प्रक्रिया पूर्ण न करताच असे पत्रक गावात फिरल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
या प्रकारानंतर काही शेतकऱ्यांनी थेट सरपंच दक्षता मेस्त्री यांच्याकडे धाव घेत “आम्हाला असे अपूर्ण आणि सही नसलेले अजेंडा का देण्यात आले?” अशी विचारणा केली. तेव्हा सरपंचांनाही याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे समोर आले.
यामुळे संतप्त झालेल्या सरपंच दक्षता मेस्त्री यांनी कृषी सहाय्यक जागृती शेट्ये यांना चांगलेच खडे बोल सुनावत, “सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीशिवाय, तसेच जावक क्रमांकाविना अधिकृत कागदपत्र गावात कसे फिरवले?” असा जाब विचारल्याची माहिती आहे.
ग्रामसभेचा अजेंडा हा अधिकृत प्रक्रिया पूर्ण करूनच ग्रामस्थांपर्यंत पोहोचवला जातो. मात्र, या प्रकरणात सर्व नियम धाब्यावर बसवून थेट अपूर्ण पत्रके वाटण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या प्रशासनिक कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे झाराप ग्रामपंचायतीतील वाद आता आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.








