“न्याय मिळाल्याचा आनंद!
कुडाळ(प्रतिनिधी)

झाराप ग्रामपंचायतीतील राजकीय घडामोडीनंतर बुधवारी सरपंच दक्षता मेस्त्री यांनी पुन्हा अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. जिल्हाधिकाऱ्यांनी अविश्वास ठरावाला दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीनंतर ग्रामपंचायतीत काहीसा दिलासा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

पदभार स्वीकारण्याच्या क्षणी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सरपंचांचे स्वागत केले. अमोल तेली, शैलू तेंडोलकर, रुपेश बिडये आणि मोसीम मुजावर यांनी पुढे येत सरपंच दक्षता मेस्त्री यांचे पुष्पगुच्छ देऊन मनापासून स्वागत केले.
या वेळी “न्यायाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.“स्वच्छ व हरित ग्रामपंचायत” या उपक्रमातून राज्यात अव्वल क्रमांक मिळवत गावाला अनेक पुरस्कार मिळवून देणाऱ्या सरपंच दक्षता मेस्त्री यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाचा तब्बल 50 लाख रुपयांचा निधी वर्षानुवर्षे वापराविना पडून होता. सरपंच दक्षता मेस्त्री यांनी पुढाकार घेत हा निधी विकासकामांसाठी वापरण्याचे धाडस दाखविले.
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय तणावानंतर ग्रामपंचायत परिसरात समाधानाचे वातावरण दिसून आले असून ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले.

दरम्यान, सरपंचांनी पुन्हा पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत आणि गतीने सुरू होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.








