झाराप ग्रामसभा :
फॉग मशीन
ठावठिकाणा नाही;
ग्रामपंचायत धारेवर
कुडाळ प्रतिनिधी
झाराप ग्रामपंचायतीच्या १६व्या वित्त आयोगाच्या आराखड्यास मंजुरी देण्यासाठी आयोजित विशेष ग्रामसभेत आरोग्य विभागाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या फॉग मशीनचा मुद्दा चांगलाच गाजला. ग्रामस्थ यांनी हा विषय उपस्थित करत जनतेच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली फॉग मशीन नेमकी कुठे आहे, असा थेट सवाल केला.
या प्रश्नानंतर सभेत झालेल्या चर्चेत फॉग मशीनची माहिती डेड स्टॉक रजिस्टरमध्येही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली. सार्वजनिक निधीतून खरेदी करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची नोंदच उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने सभागृहात तीव्र संताप उसळला. ग्रामपंचायतीमध्ये वस्तू गायब होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाचा पूर्णपणे ढिसाळ कारभार आणि जबाबदारीचा अभाव उघडपणे दिसून येत असल्याची जोरदार टीका ग्रामस्थांनी केली.
झाराप गावात सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाळ्यात डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत असताना डास नियंत्रणासाठी सर्वाधिक आवश्यक असलेली फॉग मशीनच गायब असल्याचा प्रश्न ग्रामसभेत ऐरणीवर आला. आरोग्याच्या संरक्षणासाठी सार्वजनिक निधीतून खरेदी करण्यात आलेली यंत्रणा अशा प्रकारे बेपत्ता होत असेल, तर हा सरळसरळ हलगर्जीपणा की काहीतरी मोठा गैरव्यवहार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
“जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या वस्तूंचा हिशेबच नसेल, तर ग्रामपंचायतीच्या मालमत्तेची सुरक्षितता कोणाच्या जबाबदारीवर आहे?”, “स्टॉक रजिस्टर असताना फॉग मशीनचा मागमूस का लागत नाही?”, तसेच “ग्रामपंचायतीत वस्तू गायब होण्याचा हा वाढता प्रकार कोण थांबवणार?” अशा प्रश्नांची सरबत्ती ग्रामसभेत झाली. सार्वजनिक मालमत्तेच्या नोंदी व जबाबदारीबाबत गंभीर त्रुटी असून, प्रत्यक्षात निष्काळजीपणा नव्हे तर सिस्टिमॅटिक दुर्लक्ष सुरू असल्याची भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.
फॉग मशीनचा संपूर्ण ठावठिकाणा, खरेदीपासून आजपर्यंतचा वापर, संबंधित नोंदी आणि जबाबदारी याबाबत तातडीने खुलासा करून सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी ग्रामसभेत करण्यात आली. फॉग मशीनच्या मुद्द्यामुळे १६व्या वित्त आयोगाच्या विशेष ग्रामसभेतील इतर विषय मागे पडले आणि हा विषयच संपूर्ण सभेचा केंद्रबिंदू ठरला.








