जि.प. प्राथमिक शाळा क्र. ३
कणकवली माजी विद्यार्थी (२००४-०५/२००५-०६ बॅच)
शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
कणकवली (प्रतिनिधी):

असे म्हणतात की, आपण ज्या शाळेत शिकलो, वाढलो आणि घडलो, त्या शाळेचे ऋण फेडणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे आद्य कर्तव्य असते. याच विचारातूनप्रेरित होऊन , जि.प. प्राथमिक शाळा क्र. ३ कणकवली येथील माजी विद्यार्थी (बॅच २००४-०५ / २००५-०६) यांच्या मार्फत कणकवलीतील तरुण उद्योजक -रोहन गावडे, आकाश कोदे, योगेश पेटकर तसेच प्रबोधन कदम व प्रतिक कोतवाल आदी मान्यवरांच्या उपस्थित शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असे शैक्षणिक साहित्य (वही-पुस्तके) व खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेप्रती असलेली आपुलकी आणि सामाजिक जािणवेचे दर्शन घडवत माजी विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. कार्यक्रमास सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी सौ. प्रेरणा मांजेरेकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अक्षथा राणे मॅडम, श्रीम. प्रतिभा कोतवाल मॅडम, इतर गुरुजन वर्ग, शालेय समितीचे सदस्य मुकुंद चिकोडी, आदी उपस्थित होते
मार्गदर्शन आणि मनोगत:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. प्रतिभा कोतवाल मॅडम यांनी केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सौ. प्रेरणा मांजेरेकर यांनी विद्यार्थ्यांना मुलांचे शिस्तप्रिय शिक्षणाचे महत्त्व सांगत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रतिक कोतवाल यांनी कार्यक्रमाचा उद्देश व समग्र माहिती सांगितली. प्रबोधन कदम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सामाजिक भान तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी आजपासूनच करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृसंस्थेशी जोडलेले हे नाते अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांनी दाखवलेली ही सामाजिक जाणीव इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणारे आकाश चौगुले, स्वागत कुंभार व इतर सर्वांचे आभार मानण्यात आले.

शाळेच्या वतीने माजी विद्यार्थी संघाच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानण्यात आले असून, भविष्यातही असेच सहकार्य व मार्गदर्शन शाळा पाठीशी राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.








