महसूल विभागाची जागा
नगरपंचायतीला मिळावी
समीर नलावडे
कणकवली :
कणकवली नगरपंचायत हद्दीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील जुन्या भाजी मार्केटचा विस्तार करण्यासाठी, लगतची महसूल विभागाची जागा नगरपंचायतीकडे वर्ग करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे सध्या जुने भाजी मार्केट अस्तित्वात आहे. या मार्केटला लागून असलेली महसूल विभागाच्या ताब्यातील स.नं./हि.नं. १९८/१ (क्षेत्र ०.०७ हेक्टर) ही जागा नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आहे. ही जागा मिळाल्यास कणकवलीचे भाजी मार्केट अधिक सुसज्ज व सुविधायुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत यापूर्वी कोकण आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे महसूलमंत्र्यांनी आपल्या अधिकारात या जागेबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊन ती जागा नगरपंचायतीकडे वर्ग करावी, अशी आग्रही मागणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मेधा गांगण, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, निखिल आचरेकर, राजा पाटकर यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.








