सिंधुदुर्गात पाणीटंचाईचे संकट….
कणकवलीत
गड नदी…. पाणी
अडवण्याची धडपड;…
कनकनगर केटी बंधारा…
युद्धपातळीवर……

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली पाहणी…
कणकवली |
कोकणराज लाईव्ह :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडल्याने भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. जिल्हा सध्या ट्रिगर-१ च्या टप्प्यात असून भविष्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, संभाव्य जलसंकटाची गंभीर दखल घेत कणकवली नगरपंचायतीने दोन महिने आधीच पाणी अडवण्याच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या आहेत.
कणकवलीतील गड नदीवरील कनकनगर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर (KT Wear) प्लेट्स बसविण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, येत्या चार दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहितीकणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
कनकनगर बंधाऱ्याचे काम चार दिवसांत पूर्ण होणार
नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असल्याने शहरवासीयांचा पिण्याचा पाणीपुरवठा, शेती आणि विहिरींच्या पाणीपातळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा, वनविभाग, कृषी विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाच्या समन्वयातून नियोजन करण्यात आले आहे.
३९ पिलर्सवर प्लेट्स: कनकनगर बंधाऱ्यात सुमारे ३९ पिलर्स असून, 117 मीटर नदीपात्रात कणकेची कोंड येथे 307प्लेट्स बसवून पाण्याचा प्रवाह नियंत्रित केला जात आहे.
इतर बंधारे: कनकनगरचे काम पूर्ण झाल्यानंतर कणकवली बाजारपेठेतील मराठा मंडळ परिसरातील स्मशानभूमीजवळील बंधारा आणि वागदे-कणकवलीला जोडणाऱ्या (९६ प्लेट्स व ३२ पिलर्स) बंधाऱ्यावरही पाणी अडवण्याचे काम हाती घेतले जाईल.
२०-२२ वर्षांपूर्वीचे कमकुवत बंधारे; तात्पुरत्या साहित्याचा वापर
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्पष्ट केले की, शहरात असलेले बंधारे २० ते २२ वर्षांहून अधिक जुने असल्याने कमकुवत झाले आहेत. सध्या उपलब्ध बंधाऱ्यांवर रबर, लाकूड, सिमेंट आणि मातीच्या साहाय्याने गळती रोखून पाणी अडवले जात आहे.
”नदीच्या पाण्याचा वेग पाहता काही प्रमाणात गळती होऊ शकते; परंतु या तात्पुरत्या उपाययोजनांमुळे पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत होईल. भविष्यात कायमस्वरूपी मजबूत बंधारे उभारण्याची गरज आहे.”
— संदेश पारकर (नगराध्यक्ष, कणकवली)
वनराई बंधारे अन् भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्यावर भर
मुख्य बंधाऱ्यांशिवाय गड नदी आणि जाणवली नदीपात्रात योग्य ठिकाणी वनराई बंधाऱ्यांच्या धर्तीवर (सिमेंटच्या पिशव्यांमध्ये वाळू भरून व HDPE शीटचा वापर करून) तात्पुरते बंधारे बांधले जाणार आहेत.
दोन महिने आधीच कामे: दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारी कामे यंदा कमी पावसामुळे ऑक्टोबरमध्येच सुरू करावी लागली आहेत.
भूजल पातळीत सुधारणा: या उपाययोजनांमुळे केवळ तात्पुरता साठा होणार नसून, परिसरातील विहिरी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
नरडवे धरण: नरडवे धरणांतर्गत १४ पैकी ९ बंधारे कार्यान्वित असून उर्वरित कामांनाही गती दिली जात आहे.
प्रशासकीय पाहणी व आवाहन
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष कनकनगर बंधाऱ्याच्या कामाची पाहणी करून लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदारांशी चर्चा केली. प्रशासनाव्यतिरिक्त नागरिकांनीही पाणी बचत आणि योग्य वापरासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे. या पाहणीदरम्यान साईनाथ मोरये, एकनाथ मोरये, नवनाथ पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीची ही ‘अॅडव्हान्स’ तयारी आगामी उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाईपासून किती दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







