नायब तहसीलदार -दिलीप पाटील
सत्कार व सेवापूर्ती


कणकवली प्रतिनिधी..
नैसर्गिक आपत्ती आणि संकटकाळात शेवटच्या दिवसापर्यंत अहोरात्र काम करणारे, महसूल खात्याचे ‘धोनी’ आणि ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे वैभववाडीचे नायब तहसीलदार दिलीप पाटील यांचा सेवापूर्ती व सत्कार सोहळा फोंडाघाट येथील श्री राधाकृष्णा मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. महसूल दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सत्कारमूर्ती दिलीप पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. प्रिया पाटील, आई सुनंदा पाटील, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिशांत देशपांडे, सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, माजी तहसीलदार रमेश पवार, तसेच विविधपक्षीय व सामाजिक क्षेत्रातील आदरणीय मान्यवर उपस्थित होते.
मच्छिंद्र सुकटे (निवासी उपजिल्हाधिकारी): दिलीप पाटील हे महसूल खात्याचे ‘धोनी’ असून संघटनेची कोणतीही न्याय्य मागणी मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचे कार्य आणि स्वच्छता मिशनमधील योगदान प्रेरणादायी आहे.
जगदीश कातकर (प्रांताधिकारी): महसूल क्षेत्रात निष्कलंक सेवा बजावणे हा भाग्याचा योग असतो, जो पाटील यांना लाभला. प्रशासनात ते नेहमीच ‘संकटमोचक’ ठरले.
दिशांत देशपांडे (कणकवली तहसीलदार): प्रशासकीय कामाचे धडे देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी आणि कौटुंबिक सलोखा कसा राखावा, हे त्यांनी आपल्या सहवासात शिकवले.
सूर्यकांत पाटील (वैभववाडी तहसीलदार): वाणी, वर्तन आणि विचारांमधील समतोलामुळे त्यांची सेवा खऱ्या अर्थाने समाजाभिमुख ठरली.
रमेश पवार (माजी तहसीलदार): कोरोना काळात धान्य किट गोळा करण्यापासून ते प्रत्येक आपत्कालीन कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
जनतेचे प्रेम हीच ३२ वर्षांच्या कामाची पोचपावती – दिलीप पाटील
![]()
सत्कार स्वीकारताना भावूक होत दिलीप पाटील म्हणाले, “गोरगरीबांचे काम पूर्ण झाल्यावर त्यांच्या डोळ्यात येणारे आनंदाचे अश्रू हीच माझ्यासाठी खरी ऊर्जा ठरली. ३२ वर्षांच्या प्रामाणिक कामाची पोचपावती मला जनतेच्या प्रेमातून मिळाली आहे. यापुढेही मी समाजसेवेसाठी आणि नवीन पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध राहीन.”









