अस्सल गावठी भाजीपाला;
आठवडा बाजार
कणकवली:
आरोग्यदायी आणि सकस आहाराची आवड असणाऱ्या कणकवलीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कणकवली पंचायत समिती आवारात आता ‘गावठी आठवडा बाजार’ सुरू करण्यात आला असून, या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांच्या हाताने पिकवलेला अस्सल, सेंद्रिय आणि ताजी उत्पादने थेट ग्राहकांच्या ताटापर्यंत पोहोचणार आहेत.
बाहेरच्या भाजीपाल्याला घरचा आणि आरोग्यादायी पर्याय
सध्या बाजारात मिळणाऱ्या अनेक भाजीपाल्यांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यावर उपाय म्हणून ‘स्नेहसिंधू कृषी पदवीधर संस्थे’ने पुढाकार घेत स्थानिक शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. हे गावठी उत्पादने पूर्णपणे सेंद्रिय आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहेत. प्रत्येक शुक्रवारी मिळणार ताज्या मालाची मेजवानी
हा आठवडा बाजार दर शुक्रवारी कणकवली पंचायत समितीच्या आवारात भरवला जातो. यात स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला, फळे आणि इतर गावठी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.
स्थानिक शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्याचे आवाहन
केवळ आरोग्यदायी अन्न खाण्यासाठीच नव्हे, तर कष्टकरी स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कणकवलीकरांनी या बाजाराला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन स्नेहसिंधू कृषी पदवीधर संस्थेकडून करण्यात आले आहे.
एक पाऊल आरोग्याकडे आणि दोन पावले स्थानिक शेतकऱ्यांच्या विकासाकडे!
सर्व कणकवलीकरांनी या आठवडा बाजारात भरभरून प्रतिसाद देऊन उपक्रमाला यशस्वी करावे, ही नम्र विनंती.








