आशा स्वयंसेविकां
१४ जुलैला
जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे
कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन (सिटू संलग्न) यांनी आशा स्वयंसेविकांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा सहाय्यक म्हणून केलेली नियुक्ती तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, नियुक्ती रद्द न झाल्यास येत्या १४ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा युनियनने दिला आहे.
काय आहे आशा वर्कर्स युनियनचा आक्षेप?
निवेदनात नमूद केल्यानुसार, आशा स्वयंसेविकांची नियुक्ती केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागात काम करण्यासाठी झाली आहे. त्या शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी नाहीत, तर कामावर आधारित मोबदला मिळवणाऱ्या ऐच्छिक कार्यकर्त्या आहेत. कायद्याच्या १३ ब (२) कलमानुसार, बीएलओ म्हणून केवळ शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी नियुक्त करणे बंधनकारक असताना, आशा स्वयंसेविकांवर ही जबाबदारी लादणे अन्यायकारक असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.
आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम
पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. अशा वेळी आशा स्वयंसेविकांवर लसीकरण, पल्स पोलिओ, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड आणि गर्भवती मातांना तातडीने प्रसूतीसाठी रुग्णालयात नेणे यांसारख्या अत्यंत संवेदनशील जबाबदाऱ्या असतात. निवडणूकीच्या कामामुळे या अत्यावश्यक आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होण्याची भीती युनियनने व्यक्त केली आहे.
२०१९ च्या आदेशाचा संदर्भ
यापूर्वी २३ ऑगस्ट २०१९ रोजी आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी स्पष्ट आदेश निर्गमित केले होते की, आशा स्वयंसेविकांना बीएलओ किंवा निवडणूकीची कामे देण्यात येऊ नयेत. तरीही सध्या त्यांची नियुक्ती केल्याने आशा कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
आंदोलनाची रूपरेषा
आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने १४ जुलै रोजी राज्यभर निदर्शने केली जाणार आहेत. याच मालिकेचा भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयावरही धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.








