झारापच्या शरद धुरी
‘वसंतराव नाईक कृषीभूषण’ पुरस्कार जाहीर;
गावावर अभिनंदन वर्षाव
पुरस्कारांचा सुवर्णठेवा अन् ‘कृषिभूषण’चा मान;
शरद धुरींच्या यशाचा नवा सुवर्णअध्याय!
झाराप | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रगतिशील शेतकरी शरद गणपत धुरी यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च कृषी सन्मान मानला जाणारा ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. हा पुरस्कार त्यांच्या दीर्घकालीन, सातत्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण कृषी कार्याची राज्यस्तरीय पावती मानला जात आहे.
शरद धुरी यांची कृषी क्षेत्रातील वाटचाल अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय सन्मानांनी उजळलेली आहे. सन २००९-१० मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या राज्यस्तरीय भात पिक स्पर्धेत त्यांनी राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. त्याच वर्षी राज्यस्तरीय ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ मिळवून त्यांनी आपल्या कृषी कौशल्याची छाप उमटवली.
याशिवाय राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF) कडून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषी उत्पादन वाढीसाठी त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, चारसूत्री पद्धतीने भात लागवड आणि हेक्टरी १०१ क्विंटल ५७ किलो इतके विक्रमी भात उत्पादन घेण्याची त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली.
या सर्व यशाचा परिपाक म्हणून आता त्यांना ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर झाला असून, हा केवळ शरद धुरी यांचाच नव्हे तर झाराप आणि सिंधुदुर्गच्या कृषी क्षेत्राचाही सन्मान मानला जात आहे. या पुरस्कारामुळे नव्या पिढीतील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा आदर्श मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.








