संरक्षक भिंत कोसळली;
ठेकेदाराच्या कामावर संशय,
ग्रामपंचायत पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
कुडाळ प्रतिनिधी |
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून झाराप ग्रामपंचायत परिसरात उभारण्यात आलेली संरक्षक भिंत पहिल्याच मान्सूनच्या जोरदार पावसात कोसळल्याने ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेली ही भिंत जमीनदोस्त झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जात असून, झाराप ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात दररोज विविध शासकीय कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. अशा संवेदनशील ठिकाणी उभारलेली संरक्षक भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यावेळी परिसरात नागरिक उपस्थित असते तर मोठा अनर्थ घडू शकला असता, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.या घटनेनंतर ग्रामस्थांकडून संबंधित ठेकेदाराच्या कामावर संशय व्यक्त केला जात आहे. संरक्षक भिंत ही अनेक वर्षे सुरक्षितपणे उभी राहावी या उद्देशाने बांधली जाते. मात्र, पहिल्याच पावसात ती कोसळल्याने कामात निकृष्ट साहित्य वापरण्यात आले का, बांधकाम करताना तांत्रिक निकषांचे पालन झाले का, की काम घाईघाईत पूर्ण करण्यात आले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या कामाची सखोल तांत्रिक चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, “भिंतीपेक्षा उद्घाटनाचा फलक जास्त टिकला,” अशा उपरोधिक प्रतिक्रिया उमटत आहेत. तर “सार्वजनिक पैशातून उभारलेले बांधकाम सहा महिन्यांत कोसळत असेल, तर विकासकामांच्या गुणवत्तेची जबाबदारी कोणाची?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.विशेष म्हणजे, हे काम सार्वजनिक निधीतून करण्यात आले असल्याने केवळ ठेकेदारच नव्हे, तर कामाची पाहणी करणारे अधिकारी, तांत्रिक मान्यता देणारे विभाग आणि कामाची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता तपासणी झाली होती का, वापरण्यात आलेले साहित्य शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार होते का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
या घटनेमुळे झाराप ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यापूर्वीही विविध कारणांमुळे ग्रामपंचायत चर्चेत राहिली असून, आता संरक्षक भिंत कोसळल्याने विकासकामांच्या दर्जावर नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सहा महिन्यांतच कोसळलेल्या या संरक्षक भिंतीने केवळ एक बांधकामच नव्हे, तर सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांबाबत नागरिकांच्या विश्वासालाही तडा दिल्याची भावना व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई होते की हा विषयही इतर प्रकरणांप्रमाणे कागदोपत्रीच राहतो, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.









