तरंदळे जि.प. शाळेत
ग्राम समितीच्या प्रयत्न
कराटे वर्गाची सुरुवात

तरंदळे, वार्ताहर
ग्राम शालेय व सामाजिक उपक्रम समिती, तरंदळे यांच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे गावातील जिल्हा परिषद शाळा क्र. १ ने शैक्षणिक प्रगतीचा नवा टप्पा गाठला आहे. शाळेचा पट २९ वरून ४१ वर पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘एक गाव, एक शाळा, एक परिवार’ ही संकल्पना घेऊन समितीने राबवलेल्या उपक्रमांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
पटसंख्येतील लक्षणीय वाढ
मागील शैक्षणिक वर्षात शाळेचा पट ३६ होता. त्यापैकी ७ विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी (८ वी) कणकवलीला गेल्याने ही संख्या २९ वर आली होती. शाळा टिकवण्यासाठी आणि ती अधिक सक्षम करण्यासाठी ग्राम समितीने पुढाकार घेतला. केलेल्या जनजागृतीमुळे ५ वी, ६ वी व ७ वी वर्गासाठी तब्बल १२ नवीन विद्यार्थी शाळेत दाखल झाले असून, आता एकूण पट ४१ वर पोहोचला आहे
![]()
समितीचे नाविन्यपूर्ण उपक्रम
शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समितीने खालील महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:
विद्यार्थी वाहतूक सुविधा: नव्याने दाखल झालेल्या १२ विद्यार्थ्यांच्या ने-आण करण्यासाठी समितीने दरमहा १०,००० रुपयांच्या वाहतूक खर्चाची जबाबदारी उचलली आहे.
वाचनालयाची सुरुवात: विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळेत वाचनालय सुरू करण्यात आले आहे. पालकांनी मुलांना मोबाईलऐवजी पुस्तके वाचण्यासाठी द्यावीत, असे आवाहन समितीने केले आहे.
कराटे प्रशिक्षण वर्ग: विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी दर शनिवार व रविवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी केवळ १०० रुपये मासिक फी ठेवण्यात आली असून, जास्तीत जास्त मुला-मुलींनी याचा लाभ घ्यावा.
’विद्येविना मती गेली’ – सामाजिक सहकार्याचे आवाहन
समितीचे अध्यक्ष डॉ. सत्यवान राणे यांनी सांगितले की, “महात्मा जोतिराव फुले यांच्या ‘विद्येविना मती गेली’ या विचाराने प्रेरित होऊन आम्ही हे कार्य करत आहोत. हे ध्येय गाठताना आतापर्यंत ज्या दानशूर व्यक्तींनी आणि हितचिंतकांनी सहकार्य केले, त्यांचे आम्ही ऋणी आहोत.” भविष्यातही शाळा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी आर्थिक व मानसिक पाठबळ द्यावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात संजना राणे (पंचायत समिती कणकवली सदस्य), सुशिल कदम (सरपंच, तरंदळे), डॉ. सत्यवान राणे (अध्यक्ष, ग्राम शालेय व सामाजिक उपक्रम समिती), रामनाथ सावंत (सचिव), चंद्रशेखर पोकळे (मुख्याध्यापक), रामचंद्र डोईफोडे (उप-मुख्याध्यापक), जयसिंग नाईक (माजी सरपंच), अनंत सावंत, सुनीलदत्त जाधव (ग्रामपंचायत सदस्य), संदेश सावंत (माजी उप-सरपंच), पूनम चव्हाण (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), प्राची कदम (उपाध्यक्ष), प्रभाकर कदम, प्रसाद कदम यांच्यासह वाघमारे मॅडम, वायभट्ट मॅडम, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









