सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके
नेरूर शाखा कार्यालय स्थलांतर
ओरोस प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेरूर शाखा कार्यालयाचे स्थलांतर नुकतेच नवीन वास्तूत पार पडले. नेरूर देउळवाडा येथील बापू सडवेलकर यांच्या इमारतीत हे नूतन कार्यालय सुरू करण्यात आले असून, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन आणि स्थलांतर सोहळा मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला.
या कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संचालक मंडळ, स्थानिक अधिकारी, सरपंच आणि मोठ्या संख्येने बँकेचे ग्राहक व मान्यवर उपस्थित होते.
आमदार निलेश राणे यांचे मार्गदर्शन: आमदार निलेश राणे यांनी आपल्या मनोगतात जिल्हा बँकेच्या प्रगतीबद्दल आणि अध्यक्ष मनीष दळवी यांच्या कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले. मागच्या कर्जमाफीच्या काळात सरकारने मदत जाहीर करण्यापूर्वीच जिल्हा बँक मदतीला धावली होती, आणि महाराष्ट्रात असे घडणारे हे पहिलेच उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने असेच उत्तम कार्य करत राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची भूमिका: अध्यक्ष मनीष दळवी यांनी, सामान्य शेतकरी व ग्राहकांपर्यंत बँक पोहोचवणे आणि त्यांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. बँकेच्या वाटचालीबाबत बोलताना ते म्हणाले की, ग्राहकांच्या विश्वासामुळे बँक उत्तम प्रगती करत असून लवकरच बँक ८ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी संचालक आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोरे, विद्याप्रसाद बांदेकर, सौ. नीता राणे, संदीप परब, व्हीक्टर डान्टस, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, नेरुर शाखा व्यवस्थापक सौ. युगा पेडणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जागा मालक बापू सडवेलकर यांचा बँकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला








