सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
-पालकमंत्री नितेश राणे

• आंबा पिक संरक्षणासाठी AI आणि ड्रोन प्रणालीचा वापर_
_• सेवा पंधरवडा अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप_
• जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वितरण व खर्चामध्ये राज्यात प्रथम
महाराष्ट्र दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देत सिंधुदुर्गच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, कृषी आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांमध्ये गती देण्यावर विशेष भर दिला जाईल, असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी येथे पार पडला. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडिमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य कार्यक्रमानंतर महाराष्ट्र राज्याच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापना दिनानिमित्त कुडाळ येथील ‘चिमणी पाखरं’ या ग्रुपच्यावतीने नृत्याचे आयोजन देखील करण्यात आले होते.
पालकमंत्री श्री राणे पुढे म्हणाले की, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाला नवी ओळख मिळाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेक हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि क्रांतिकारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, तर महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यासारख्या महान विभूतींनी समाजाला समतेचा आणि प्रगतीचा मार्ग दाखवला. याच दिवशी आपण कामगार दिनही साजरा करतो. कामगार हा देशाच्या प्रगतीचा खरा कणा आहे. आपण सर्वांनी कामगारांच्या सन्मानासाठी, त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. १ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. याच तारखेला १९८१ साली आपला सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आला. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनेला ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. १ मे ही तारीख सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. मागच्या वर्षी याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा हा AI कार्यप्रणाली वापरणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला. आपण AI टेक्नॉलॉजी ही आधुनिक यंत्रणा वापरून आणखी तत्पर झालो आहोत ही सिंधुदुर्ग वासियांसाठी आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. दरडाई उत्पन्नामध्ये राज्यात अग्रस्थानी राहावा यासाठी विकासात्मक कामांना मी नेहमीच प्राधान्य देणार आहे. भारत सरकार तर्फे होणारी जणगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. या जनगणनेमध्ये प्रथमच नागरिकांना स्वगणना म्हणजेच स्वतःची माहिती स्वतः ऑनलाइन पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही स्वगणना १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत करावयाची असून आपली माहिती se.census.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची आहे. १५ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या घरगणनेमध्ये सर्वांनी प्रशासकीय यंत्रणेस सहकार्य करावे
पालकमंत्री श्री. राणे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा’ कालावधीत ५७ हजार ५०० विद्यार्थ्यांना शाळांमध्येच वय आणि अधिवास प्रमाणपत्र तर ७ हजार ८०० पात्र विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने सर्वोच्च महसूल वसुली केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात कोकण विभागात सर्वात प्रथम १०० टक्के संकलन पूर्ण केले. सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेतील २८२ कोटी रुपयांचा निधी वितरण व खर्चामध्ये आपला जिल्हा राज्यात प्रथमस्थानी राहिला आहे








