जागतिक पर्यावरण
वृक्षारोपण
कुडाळ प्रतिनिधी , :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाराप येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. झाराप ग्रामपंचायतीच्या सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि झपाट्याने होणारी वृक्षतोड यामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित केली. केवळ वृक्ष लागवड करून न थांबता त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे हीदेखील प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास अमोल तेली, सुभाष माणगावकर, नाथा काळसेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करत गाव अधिक हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शाळा परिसरात विविध प्रकारच्या सावली व फळझाडांची लागवड करण्यात आली.
सध्या वाढत्या तापमानामुळे आणि जंगलांच्या ऱ्हासामुळे पर्यावरणासमोरील आव्हाने अधिक गंभीर बनत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातून राबविले जाणारे वृक्षारोपणाचे उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्यास निश्चितच हातभार लावतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
झाराप ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त सहभागातून पार पडलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. भविष्यातही अशाच प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून गाव हरित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
छायाचित्र : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाराप येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा परिसरात वृक्षारोपण करताना सरपंच दक्षता मेस्त्री, डॉ. प्रसाद देवधर, अमोल तेली, सुभाष माणगावकर, नाथा काळसेकर,मोहसीन मुजावर व अन्य ग्रामस्थ.








