कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र
डॉ. कुबेर मिठारी यांची पुन्हा नियुक्ती करा
माजी सरपंच अतुल दळवी
कणकवली | प्रतिनिधी
कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल २० वर्षे अविरत आणि निस्वार्थी आरोग्य सेवा बजावणाऱ्या डॉ. कुबेर मिठारी यांची पुन्हा त्याच केंद्रात नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी कळसुलीचे माजी सरपंच अतुल दळवी यांनी केली आहे. डॉ. मिठारी यांच्या बदलीमुळे परिसरातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
‘आरोग्यदूत’ म्हणून जनमानसात स्थान
डॉ. कुबेर मिठारी यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” या मंत्राचा प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घालून दिला. केवळ दवाखान्यातच नव्हे, तर रात्री-अपरात्री गंभीर रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करण्यात डॉ. मिठारी यांचा हातखंडा होता. त्यामुळेच ते गावकऱ्यांसाठी केवळ डॉक्टर नसून एक मोठा ‘आधार’ ठरले होते. गावातील प्रत्येक रुग्णाची आरोग्यविषयक पार्श्वभूमी (हिस्ट्री) त्यांना तोंडपाठ होती, ज्यामुळे रुग्णांना वेळेवर अचूक उपचार मिळणे सोपे होत असे. आरोग्य सेवेसोबतच गावातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्या मुळे पेशंटचे प्रमाण वाढत असते अशावेळी डॉ मिठारी यांच्या सारख्या अनुभवी सक्षम डॉक्टरची नितांत आवश्यकता आहे..
केवळ कळसुलीच नव्हे, तर अनेक गावांना आधार
डॉ. मिठारी यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार केवळ कळसुली गावापुरता मर्यादित नव्हता. शिरवल, हळवल, शिवडाव, कसवण-तळवडे, बोर्डवे, वागदे आणि ओसरगाव यांसारख्या दुर्गम भागातील हजारो रुग्णांसाठी ते आरोग्यसेवेचा प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे या संपूर्ण परिसरातील आरोग्य व्यवस्था सक्षम झाली होती.
बदलीमुळे आरोग्य सेवा विस्कळीत
डॉ. मिठारी यांची बदली झाल्यानंतर कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार विस्कळीत झाला आहे. नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप होत आहे. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने सामान्य नागरिक, वृद्ध आणि लहान मुलांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रशासनाला तातडीच्या निर्णयाची अपेक्षा
नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता, प्रशासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष द्यावे आणि ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करून डॉ. कुबेर मिठारी यांना पुन्हा कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त करावे, अशी मागणी अतुल दळवी यांनी केली आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे








