दिलीप पाटील
लोकाभिमुख अधिकारी!
र्वैभववाडी तहसील कार्यालय
सेवानिवृत्ती सत्कार

वैभववाडी :
“नोकरी ही केवळ उपजीविकेचे साधन म्हणून नव्हे, तर लोकाभिमुख सेवा म्हणून पार पाडणारे नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी आपल्या मृदू वाणी, सकारात्मक विचारसरणी आणि सौजन्यपूर्ण वर्तनाच्या बळावर सर्वसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि आदर्श सेवाकाळाचा प्रत्येक कर्मचाऱ्याने आदर्श घ्यावा,” असे गौरवोद्गार तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी काढले.
वैभववाडीचे नायब तहसीलदार दिलीप पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त तहसील कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील व त्यांच्या पत्नी सौ. पाटील, नायब तहसीलदार शिवाजी सुतार, नायब तहसीलदार श्री. निकम, महसूल सहायक संतोष नागावकर, डॉ. उदयसिंह पाटील, सदानंद रावरणे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात कोतवाल बाळू पेडणेकर, ग्राम महसूल अधिकारी श्री. बागुुल यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना दिलीप पाटील यांच्या कार्यतत्परतेचा, लोकाभिमुख दृष्टिकोनाचा आणि सहकार्यशील स्वभावाचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना दिलीप पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील अनेक संस्मरणीय अनुभव आणि प्रसंग उपस्थितांसमोर मांडले. सेवेत मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी गणेश गोडे यांनी केले, तर आभार महसूल सहाय्यक संतोष नागावकर यांनी मानले. समारंभास तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल तसेच मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

फोंडाघाट येथे 1 ऑगस्ट रोजी सेवापूर्ती सन्मान सोहळा
वैभववाडीचे निवासी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता फोंडाघाट येथील श्री. राधाकृष्ण मंगल कार्यालय हवेली नगर येथे आयोजित केला आहे.
सोहळ्यास निवासी उपजिल्हा अधिकारी मच्छिंद्र सुकटे, सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, माजी जि.प. सदस्य संजय आंग्रे, कणकवलीचे प्रांताधिकारी जगदिश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, दैनिक पुढारीचे आवृत्ती प्रमुख गणेश जेठे, निवृत्त तहसिलदार आर.जे.पवार, जि.प.सदस्य राजन चिके, मनोज रावरणे, प्रमोद रावरणे, सिद्धी सुतार, वैभववाडी सभापती सिद्धेश रावरणे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन कुर्ली, नवीन कुर्ली ग्रामस्थ, पाटील परिवार, महसूल विभाग व मित्र परिवारतर्फे करण्यात आले आहे.









