“भारत देशाच्या हितासाठी काय आवश्यक आहे, हे अविनाश धर्माधिकारी यांनी आपल्या व्याख्यानातून अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो,” असे प्रतिपादन भाजप नेते, खा. नारायण राणे यांनी केले

कणकवली येथील स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला पाहिल्या दिवसाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आ. प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. किरण गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला उद्घाटन अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले.

खा. नारायण राणे म्हणाले, “योग्य वेळी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून धर्माधिकारी यांनी वास्तव भारताचे विचार समाजासमोर मांडले आहेत. त्यांनी जे मुद्दे मांडले, तेच मी बोललो असतो तर विरोधकांनी त्यावर टीका केली असती. त्यामुळे आता विरोधकांना उत्तर देण्याची गरज उरलेली नाही.”
काँग्रेसवर टीका करताना राणे म्हणाले, “काँग्रेसला देशहित बघायची सवय नाही. भारताचे संरक्षण आणि हित जपण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. याबाबत राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करावे.”
अविनाश धर्माधिकारी यांच्या भाषणातून सर्वांनी बोध घेऊन त्यानुसार कृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले








