कोकणातील लोककला
“भारुड महोत्सव 2026″
कणकवली, दि. ५ ऑगस्ट:
कोकणातील लोकप्रबोधन, समाजप्रबोधन व अध्यात्माचा प्रभावी लोककलाप्रकार असलेल्या भारुड कलेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने, कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था यांच्या वतीने “भारुड महोत्सव – २०२६” या भव्य सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक: रविवार, ९ ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत
स्थळ: नांदगाव तिठा, नांदगाव
सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा उदात्त हेतू
भारुड हा महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील एक अत्यंत प्रभावी लोककलाप्रकार आहे. याद्वारे रामायण, महाभारत, गरुडपुराण तसेच विविध पुराणग्रंथांतील प्रसंग रंजक व विचारप्रवर्तक शैलीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवले जातात.
बदलत्या काळात भारुड सादरीकरणाचे प्रमाण कमी होत चालले असून ही पारंपरिक लोककला लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे. हा सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि भजन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी, या हेतूने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी हे निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.
महोत्सवामध्ये विविध मान्यवर भारुड कलाकार व भजनी बुवांचे दर्जेदार सादरीकरण होणार आहे. भजनप्रेमी, भारुड रसिक, वारकरी बांधव तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस तालुकाध्यक्ष श्री. प्रकाश सखाराम पारकर, उपाध्यक्ष मारुती मेस्त्री, सचिव निलेश ठाकूर, खजिनदार श्री. सुदर्शन फोपे, सहसचिव श्री. मयूर ठाकूर, श्री. चंद्रशेखर चव्हाण, श्री. मंगेश खाडये, लक्ष्मण बागवे, चंद्रकांत गुरव, श्रीकांत शिरसाट, पंढरी जाधव, उदय पारकर, चंद्रकांत गुरव,महानंदा चव्हाण
यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
— कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था, कणकवली









