शैक्षणिक गुणवत्ता
गावचे नावलौकिक ..
आशिये प्राथमिक शाळेत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटना व युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे वह्यांचे वाटप
कणकवली:
“विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करून शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी आणि भविष्यात स्वतःच्या कष्टाने गावाचे नाव उज्ज्वल करावे,” असे आवाहन आशिये गावचे सरपंच महेश गुरव यांनी केले. आशिये पूर्ण प्राथमिक शाळेत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटना व युवा संदेश प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
शैक्षणिक प्रगतीसाठी सामाजिक बांधिलकी
आशिये प्राथमिक शाळेची इमारत पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने अद्ययावत उभारण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत सदैव तत्पर आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे निलेश सांबरे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील निस्वार्थी कार्य आणि युवा संदेश प्रतिष्ठानचे गोट्या सावंत यांनी उपलब्ध करून दिलेल्या मदतीमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुकर झाला आहे.
मान्यवरांचे मार्गदर्शन
याप्रसंगी कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच वह्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सरपंच महेश गुरव यांची शैक्षणिक उपक्रमांबाबतची तळमळ वाखाणण्याजोगी आहे.”
तसेच, माजी सरपंच शंकर गुरव यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करण्याचा सल्ला दिला. “गावचे भविष्य तुमच्या हातात आहे, त्यामुळे मोठे झाल्यावर आपल्या गावाच्या प्रगतीसाठी योगदान द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाची उपस्थिती
या कार्यक्रमाला उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव, ग्रामपंचायत सदस्य सुहास गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संजय बाणे, मुख्याध्यापिका वृषाली मसुरकर, शिक्षिका श्रीमती सामंत, शिक्षक श्री. कदम यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. कदम यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका वृषाली मसुरकर यांनी मानले.








